वंजारी
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वंजारी - यांनां बंजारा, सुकलीर, लवाण, लमाण, लंबाडी व बंजारी अशीं दुसरीं नावें आहेत. यांची एकंदर लोकसंख्या (१९११) १०८४९५५. यांच्यांत हिंदु, शीख, जैन व मुसुलमान (६१ हजार) हेहि आहेत. बहार, ओरिसा, मुंबई, मध्यप्रांत, वर्हाड, मद्रास, पंजाब, संयुक्तप्रांत, हैद्राबादसंस्थान (सर्वांत जास्त वस्ती ४I लक्ष), काश्मीर, म्हैसूर व राजपुताना यांची वस्ती आहे. यांच्या ज्या निरनिराळ्या पोटजाती आहेत त्या:- चारण, गवार, माथूर, लाड, खदाने, लामथे, मेहुरान, भुसारे, असत्कर, रावजिन, इत्यादि . यांचा पूर्वीचा धंदा बैलांचे तांडेबाळगून माला (धान्या) ची ने आण करणें, हा होता. आगगाड्या झाल्यापासून हा धंदा बसल्यानें हल्ली ते जनावरांची अवलाद तयार करणें, मजुरी, सावकारी व शेती करणें हीं कामें करतात. हे त्या त्या प्रांतातील अशुद्ध भाषा बोलतात. मुख्य भाषा नेमाडी व हिंदी. माथूर, लमाण वगैरे कांही पोटजाती मद्यमांस खात नाहींत. बाकीचे खातात. म्हैसूरकडे बायकाहि दारू पितात. कांहीचा पेहराव स्थानिक असतो तर साधारण पोषाख रजपुतांप्रमाणें असतो. माथूर, लमाण व चारण सुवासनी स्त्रिया डोईवर वेणींत एक (अगर दोन) खुंटी उभी ६ इंच लांबीची खोवतात. वरील पोटजातींत अन्नव्यवहार होतो; सोयरिकी होत नाहीत. प्रत्येक जातींत वंशपरंपरागत नाईक असतो व पंचायती असतात. माथूर व लमाणांखेरीज इतरांत विधवाविवाह संमत आहे. उपाध्याय ब्राह्मण, गोसावी, बैरागी किंवा मानभावहि असतात. गोकुळअष्टमीचा सण फार मोठा मानतात. यांच्यांतील आडनांवें: पवार, चव्हाण, राठोड, जाधव, पलटे, कोर्च, लोहाण, वनोदे, अलोदे, बकीया, किलत, वर्तिया, विश्वावत, जाराबोला या आहेत. चारण हे इतरांपेक्षां सुरेख, पैसेवाले, टापटिपीचे, सदृढ असे असतात. यांचे केंस लांब असतात. यांनां गाण्यानाचण्याचा नाद विशेष आहे. सर्व हिंदु देव (विशेषत: श्रीकृष्ण व बालाजी) यांनां पूज्य आहेत. लमाण व माथूर यांच्यांत मुंजी होतात व खंडोबाचा गोंधळ घालतात. लाड वंजार्यांत लग्न लागल्यानंतर, रात्रीं नवराबायको दोन शेर डाळ तांदूळ शिजवितात. तीं शिजवितांना तोंडाला पदर घ्यावा लागतो. कारण शिजलेल्या अन्नाचा वास अशुभ मानतात. नंतर तें अन्न सर्वांना प्रसाद म्हणून वाढण्यांत येतें. हें अन्न उरतां कामा नये. उरलें तर तें नदींत टाकतात. किंवा गाईला चारतात. या विधीला वाढीदैवत म्हणतात. गांधर्वपद्धतीचा विधवाविवाह यांनां संमत आहे. वंजारी कांहीं स्थाईक तर कांहीं भटके असतात. माथूर जातीच्या घरी अग्नि नेहमीं असतो तो विझल्यास ते अन्न ग्रहण करीत नाहींत. यांच्यांत बहुधां गवारीया जातीचे पंच असतात. लाडांच्या लग्नांत धोबिणीचा फार मान असतो. देवकस्थापनेच्या वेळी नवरीच्या हातांत शिध्याचें शिप्तर व काकवी घालून तयार केलेला व हळदीनें माखलेला रोट असतो आणि नवर्याच्या खांद्यावर कुर्हाड व दोर असतो. यांची पांचपालवी, आंबा, जांभूळ, उंबर, सादवन्ती व रूई यांची असते. लवण (मीठ) पासून लमाण व वनचर किंवा वाणिज्यपासून बनज (पंजाबी), बनजारी शब्द बनले असे म्हणतात. पूर्वी लष्करांनां त्यांच्या फिरतीवर धान्याची रसद पूरविण्याचें काम यांच्याचकडे होतें. सन १५०४ मध्यें शिकंदराच्या धोलपूरच्या हल्ल्याच्या वर्णनांत लमाणांचे नांव आढळतें. मुंबईकडील वंजार्यांत कुणबी, चांभार, भाट, मांग, महार, अहीर, कोळी, गुजर, अगास, न्हावी, सोनार, या पोटजाती आढळतात. (सेन्सस रि. १९११, मुंबई. पृ. २८२.) कानडीभागांत व मध्यभागांत वंजारी अट्टल चोर म्हणून आख्या असून गुरें चोरून नेणें, दुसर्यांच्या बायका फूस लाऊन पळवून नेणें व खोटें नाणें पाडणें याबद्दल त्यांनां पूर्वी शिक्षां झालेल्या आहेत (कित्ता). चारण, मराठे व लमाण्यांत मुली २० ते ३० वर्षंपर्यंत अविवाहित असतात. चारण धनगरांत दिराशीं पुनर्विवाह होतो. मृत माणूस अविवाहित असल्यास जाळीत नाहींत, पुरतात. लमाणांत श्राद्धें करीत नाहींत. कानडी वंजार्यांचा मुख्य नाईक विजापूर जिल्ह्यांत कोनूर येथें आहे. त्याची फी १। रूपया असते. तिकडे सरकारी कोर्टात न जातां बहुतेक तंटे पंचायतीमार्फतच तोडतात. अपराध्यानें दंड न दिल्यास तो त्याच्या १५ व्या पिढीपर्यंत वसूल करण्याचा अधिकार पंचांस आहे. पंचमहाल जिल्ह्यांत ५२ नायकांची मोठी पंचायत आहे. तिचा अधिकार अपिलें ऐकण्याचा व नायकांवर खटले चालविण्याचा आहे. वंजार्यांची उत्पत्ति चारण व भाट यांच्यापासून झाली असें कंबरलेन म्हणतो. सन १५०४ नंतर यांचा स्पष्ट उल्लेख १६३० मध्यें आढळतो. त्या साली असफरखानाची स्वारी दक्षिणेंत झाली तेव्हां तिच्यांत धान्य पुरविण्यास भंगी, जंगी आणि भगवान नांवाचे तीन नाईक होते. या तिघांजवळ २३२००० बैल होते. यांनां शहाजहानशहानें धान्यपुरवठा करणाबद्दल ताम्रपट दिला होता, तो यांच्या वंशजांजवळ (मोंगलाई, हिंगोलीजवळ मुसागांव येथें आहे.) मध्यप्रांतांतील तुर्कियामुकेरी हे मुसुलमान वंजारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यांत यांचा दारूच्या दुकानांत साखरपुडा होतो; वर वधूच्या घरीं लग्नापूर्वी १ महिना (तोंडावर बुरखा घेऊन) राहतो व तिच्या नातेवाईकांस दारू पाजतो. विधवेनें दिराखेरीज इतरांशी लग्न केल्यास दिरास ७५ रू. दंड देतात. मिठू भूखिया म्हणून पूर्वी होऊन गेलेला एक वंजारी दरोडेखोर इकडील वंजार्यांचा देव आहे. दरोडयांतील प्रत्येक वांटणींत त्याचा भाग ठेवतात. वंजार्यांचे कुत्रे फार प्रसिद्ध असतात. यांच्या बायका कशिद्याचें काम करतात. पंजाबांत हे बुरूडकामहि करतात. एकंदरींत हे लोक शूर, धाडशी व धूर्त आहेत. गांवाबाहेर बहुधां निराळ्या वस्तीत ते राहतात. गुन्हेगारांच्या यादींत त्यांचें नांव असतें. हल्लीं त्यांनीं त्याविरूद्ध चळवळ चालविली आहे व ते थोडेंफार शिक्षणहि घेऊं लागले आहेत. रा. वामन केशव पाटील पिंपळे वणजारी मु. मासवण, ता. माहीम, जिल्हा ठाणें, हे कळवितात कीं ''जातीचें चातुर्वण्यव्यवस्थेंतील स्थान वैश्यवर्गाचें आहे असें श्री शंकराचार्य द्वारकापीठ यांनी तोंडीं सांगितलें, परंतु याविषयीं जातीचा समज आपण क्षत्रियवर्ग आहों असा आहे. ठाणें जिल्ह्यां त वंजारी लोकांत शिक्षणाचा प्रसार वाढत असून वकिली व सरकारी नोकरींतहि त्यांचा थोडासा प्रवेश झाला आहे. यांच्यांत कमल व कश्यप हीं गोत्रें आहेत.'' [ वंजारा मोनोग्राफ; सेन्सस रि. (१९११) मुंबई २८२; म्हैसूर १९११; नाशिक, ठाणें व खानदेश ग्याझेटीयर्स ]-
Comments
Post a Comment