होयसळ राज्य
विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद होयसळ राज- होयसळ हे इतर प्रसिद्ध घराण्यांप्रमाणे सोमवंशी यदु कुलांतील होत. पोयसळ, चोयसळ, होयसळ, व होयसण वगैरे त्यांचीं निरनिराळीं नांवे आहेत. ह्या घराण्याची पौराणिक वंशावळ प्रथम इ. स. १११७ च्या एका ताम्रपटांत, म्हणजे बहुधां हें घराणें उदायास आणणारा विष्णुवर्धन याच्या वेळी, दिलेली आढळते. ऐतिहासिक वंशावळ विनयादित्यापासून (इ.स. १०४८) सुरू होते. त्यांचा इतिहासप्रसिद्ध पहिला राजा बिट्टिदेव उर्फ बिट्टिग ह्यानें द्वारसमुद्र शहर स्थापून तेथें सन ११११ पासून ११४१ पावेतों राज्य केलें. आरंभीं या राजाचा आश्रय जैन धर्मास होता, आणि त्याचा प्रधान गंगराज यानें पुष्कळ जैन मंदिरें बांधिलीं. परंतु रामानुजानें (१०१६-११३७) यावेळीं भक्तिमार्ग सुरू केला, त्याचा परिणाम बिट्टिदेवावर होऊन तो वैष्णव धर्माचा उपासक बनला. त्यानंतर विष्णुचीं उत्कृष्ट मंदिरें त्यानें द्वारसमुद्र व इतरत्र बांधिली. त्यानें स्वत: आपलें नांवहि विष्णुवर्धन असें धारण केलें. विष्णुवर्धनानें व त्याच्या अनुयायांनी...