कंस - यदुकुलोत्पन्न सात्वतपुत्र

कंस - यदुकुलोत्पन्न सात्वतपुत्र जो अंधक, त्याच्या वंशांत जन्मलेल्या उग्रसेन राजाच्या नऊ पुत्रांतील ज्येष्ठ.  हा कालनेमि नामक असुरांशानें जन्मला होता म्हणून स्वभावतःच दुष्टबुद्धीचा असे.  जरांसधकन्या अस्ति आणि प्राप्ति या दोघी याच्या बायका होत्या.  चुलता देवक राजा, याच्या देवकी कन्येचा विवाह वसुदेवाशीं यानें मोठ्या समारंभानें केला; व त्या वधुवरांस रथारूढ करून आपण सारथी होऊन, नगरांतून मिरवीत निघाला असतां, मार्गांत देववाणीनें त्यास असें सांगितलें कीं या देवकीचा अष्टम गर्भ तुला मारील.  त्यावरून त्यात तत्काळ देवकीवर खड्ग उपसलें.  तेव्हां वसुदेवानें हिला जें जें अपत्य होत जाईल तें तें मी तुला आणून देत जाईन असें कंसाला वचन दिलें.  त्यावरून त्यानें देवकीस सोडून दिलें.

वसुदेव बोलल्याप्रमाणें झालेलें अपत्य देतो कीं न देतो अशा संशयावरून त्यास व देवकीस आपल्या समीप प्रतिबंधांत ठेवावें असें कंसाच्या मनांत आलें.  परंतु उग्रसेन ही गोष्ट न ऐकेल म्हणून यानें प्रथम उग्रसेनास प्रतिबंधांत ठेविलें व आपण राज्य चालवूं लागला, व वसुदेवदेवकीस प्रतिबंधात ठेविलें.  प्रतिबंधांत असतां देवकीस पहिल्यानेंच पुत्र झाला, तो वसुदेवानें बोलल्याप्रमाणें कंसास देतांच याच्या मनांत त्यास मारूं नये कारण अष्टम गर्भापासूनच आपल्यास भय आहे असें प्रथम आलें; परंतु लागलाच विकल्प येऊन यानें तो बालक मारिला.  याप्रमाणें त्यांनें देवकीचे सहा पुत्र मारिले.  पुढें देवकी सातव्यानें गर्भिणी झाली असतां, तो गर्भ देवमायेनें तिचा जिरून गोकुळांत नंदासमीप वसुदेवाची स्त्री रोहिणी होती तिच्या उदरीं जाऊन ती तिकडे एकाएकीं गर्भिणी झाली.  अशा रीतीनें सातवा गर्भ जिरला हें वर्तमान कंसास कळताच त्यानें अष्टमगर्भाविषयीं अतिशय सावधपणा राखिला : परंतु तो अष्टम बालक जन्मून वसुदेवानें त्यास गोकुलामध्यें नंदगृहीं सुरक्षित पोहोंचवून त्याच समयास त्यास तिकडे झालेली कन्या मथुरेस बंदिशाळेंत आणिली, तेव्हां कंसास देवकी प्रसुत झाली असें कळलें.  मग तो लागलाच धावला व त्या कन्येस धरून मारूं लागला; तों ती त्याच्या हातून निसटून आकाशांत अदृश्य झाली.  सातवा बलराम व आठवा कृष्ण अशा प्रकारें वांचून गोकुळांत वाढूं लागले.  पुढें कंसास असें कळलें कीं, देवकीचे शेवटले दोन पुत्र गोकुळांत वाढत आहेत.  म्हणून पूतना, अघासुर, केशी इत्यादि दैत्यांस यानें क्रमाक्रमानें गोकुळांत पाठविलें.  त्यांचा वध झाला असतां, याचा निश्चय झाला कीं देवकीचे हे पुत्र होत यांत शंका नाहीं.  मग यानें धनुर्यागाच्या निमित्तानें त्यांस गोकुलांतून मथुरेस आणण्याकरितां अक्रूरास पाठविलें त्याप्रमाणें अक्रूर त्यास घेऊन आला असतां चाणून व मुष्टिक हे मल्ल यानें त्यांवर मल्लयुद्धाच्या मिषानें सोडले. त्यांस उभयतांनीं मारून कृष्णानें तत्काळ कंसास धरिलें व त्याच्याच खड्गानें त्याचा शिरच्छेद केला (भाग १० स्कं. अ. २६ ३६ ४४).

Comments

Popular posts from this blog

अग्निकुल सिद्धांत के अनुसार #चार #क्षत्रिय #राजपूत_कुलों

कर्नल जेम्स टोड द्वारा गुर्जर शिलालेखो का विवरण